अमृतानुभव

अमृतानुभव कौमुदी
पुस्तकाचे नाव: अमृतानुभव कौमुदी
लेखक: श्री बाबाजी महाराज पंडित
प्रस्तावना: डॉ. धुंडिराज विनोद.

-१-
अमृतानुभव हे एक सूर्यबिंब आहे.
श्री श्री श्री बाबाजींनी त्या सूर्यबिंबाचे किरण महाराष्ट्रीय जनतेच्या अंत:करणात परावर्तित करण्यासाठी या कौमुदी नामक प्रभातरल महाभाष्याचा आविष्कार केला आहे.
ही ‘कौमुदी’ अवलोकन करताना बुद्धीच्या डोळयांना शीण पडत नाही, ते दुखावत नाहीत, सुखावत असतात आणि सारखे सुखावलेलेच राहतात. अंत:चक्षूंना तर ही ‘कौमुदी’ म्हणजे भव्य-दिव्य नेत्रोत्सव वाटतो.
या ‘अमृतानुभव कौमुदी’च्या शांत मधुर प्रकाशामागे श्री. गुलाबराव महाराज यांच्या आत्मप्रभेचा ठाणदिवा व श्रीज्ञानेश्वर माऊलीचा प्रसादचंद्रमा, अशी दोन तेजो-बिंबे अद्वयानंद-वैभवांत विलसत असल्याचा मला तरी स्वयंस्पष्ट प्रत्यय येत आहे.
श्री ज्ञानेश्वर माऊलीने गुलाबराव महाराजांना जो ‘अमृतानुभव’ दिला, जी ‘अपरोक्षानुभूति’ दिली, ‘जे ये हृदयीचे ते हृदयी घातले’ ते संविद्रहस्य कौमुदीच्या रजतरसात महाराष्ट्रजनतेसाठी श्री बाबाजी महाराज पंडित यांनी साकार करून ठेवले आहे.
-२-
श्री शंकराचार्यांची ‘अपरोक्षानुभूति’ आणि श्री ज्ञानेश्वर महाराजांचा ‘अमृतानुभव’ हे दोन्ही ग्रंथ एकाच अनुबंधचतुष्ट्याचे आहेत. अमृतानुभव वाचताना, अपरोक्षानुभूतीचे पार्श्वसंगीत ऐकू आल्याशिवाय राहत नाही. दोन्ही ग्रंथांची प्रक्रिया व फलश्रुति तत्वत: एकच आहे.
‘अपरोक्षानुभूति’ या ग्रंथांतील विवेचन विशेषत: श्लोक नव्वद ते शंभर-ध्यानात घेतले तर श्री आचार्यांच्या व श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या भूमिकेतील तात्त्विक तादात्म्य सहज लक्षात येईल. श्री ज्ञानेश्वर महाराजांप्रमाणे आचार्यदेखील जगाचे उपादन कारण ब्रह्मच आहे असे मानतात, (अपरोक्षानुभूति, १४-१५)
स्वत:च्या अनुभवाची वि-चिकित्सा करून अंतिम सत्याचा शोध लावणे हे अपराक्षानुभुति व अमृतानुभव या दोन्ही ग्रंथांचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
-३-
‘अमृतानुभव’ हा खरा स्वाध्याय ग्रंथ आहे. शुद्ध विचार कसा करावा व शुद्ध कसा अनुभवावा हे अमृतानुभव ग्रंथ शिकल्याने समजते.
साधक, जिज्ञासू, चिकित्सक व मुमुक्षू या सर्वांनी, अमृतानुभव हा ग्रंथ स्वत:चा स्वाध्याय ग्रंथ म्हणून निवडावा, व प्रत्यही या ग्रंथाचे अध्ययन, मनन व निदिध्यासन करावे.
महाराष्ट्रातील संशोधन केंद्रे व विश्वविद्यालये यांच्या अभ्यासक्षेत्रात ‘कौमुदी’-सहित अमृतानुभवाचा अवश्यमेव अंतर्भाव व्हावा, असे माझे आग्रहाचे निवेदन आहे.
‘कौमुदी’ हे वार्त्तिक, जिज्ञासू अभ्यासकाला व मुमुक्षू साधकाला, सारखेच उद्बोधक व स्फूर्तिदायक होईल.
‘कौमुदी’च्या विवेचनात तौलानिक बुद्धीच्या चिकित्सकाला आवश्यक अशी कठोर तर्कनिष्ठा असून, शिवाय मुमुक्षूला उपकारक अशी समन्वय दृष्टीही आहे. अन्वय व व्यतिरेक या दोन्ही पद्धतींनी अमृतानुभवांतील मध्यवर्ती अद्वैत सिद्धांताची न्यायनिष्ठूर व सर्वांग सुंदर अशी सजावट ग्रंथकर्त्याने केली आहे.
-४-
अमृतानुभवावरील या ‘कौमुदीच्या’ विशाल तात्विक भूमिकेचे केवळ स्थूळ दिग्दर्शन देखील या चार प्रास्ताविक शब्दांत करणे मला शक्य झाले नाही. कौमुदीच्या संदर्भात अमृतानुभव हा पाठ मी स्वीकारला आहे खरा पण अनुभवामृत हा पाठ स्वत: श्री ज्ञानेश्वरमहाराजांनी दिला असल्यामुळे मला तो अधिक ग्राह्य वाटतो. अनेक गूढ-जटील प्रश्नांची मूलगामी चर्चा श्री बाबाजीमहाराज यांनी आपल्या या गहनगंभीर व प्रसन्नमधुर भाष्यांत केली आहे व श्री शंकराचार्य श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या अद्वैत सिद्धांताच्या मीमांसेत परिपूर्ण एकवाक्यता आहे हेच निराग्रह बुद्धीला पटण्याजोगे आहे.
आद्य आचार्यांनी साधकांच्या भूमिकाभेदांना अनुरूप अशा अनेक उपपत्ति सुचविल्या आहेत; अनेक कल्पनांचा परामर्श घेतला आहे.
स्वत: श्री ज्ञानेश्वर महाराजांनी देखील ज्ञानेश्वरी, चांगदेव-पासष्टी व अमृतानुभव यांत बहुतेक सर्व दार्शनिक वादोपवादांची मूलग्राही मीमांसा केली आहे.
परंतु, दोघांचीही अंतिम भूमिका, दोघांचाही स्वत:चा दृष्टीकोन सर्वथैव एकरूप आहे. त्यात, तत्त्वत: अणुमात्र देखील भेद नाही व तो संभवतच नाही.
श्री बाबाजी महाराज यांनी ‘कौमुदी’ मध्ये हे स्वरूपैक्य आपल्या प्रखर प्रज्ञेने व सोज्वळ श्रद्धेने विशद करून ठेवले आहे.
स्वत:चे प्रज्ञावैशिष्ट्य सिद्ध करण्याच्या हेतूने आचार्य व श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्यामध्ये काल्पनिक भेद व भेदग्रह निर्माण करणाऱ्या काही विद्वानांना या ‘कौमुदी’ने कायमचे निरूत्तर केले आहे. या महत्कार्याबद्दल श्री श्री श्री बाबाजींना माझे सहस्रश: धन्यवाद!
प्रत्येक महाराष्ट्रीय व्यक्तीने या कौमुदीच्या पुण्य-धवल आकाश गंगेत स्वत:ला पुनीत करून घ्यावे अशी माझी प्रार्थना आहे.
माझे गेल्या दोन तपांचे विद्वान स्नेही, श्री. ज्ञानेश्वर उद्धव मांढरे, या भक्तिवेल्हाळ संत पाईकामुळे मला हे चार शब्द लिहिण्याचा सुयोग आला.
श्री. मांढरे हे श्री. गुलाबराव महाराजांचे साक्षात् शिष्य, मंत्रदीक्षित व अन्तेवासी आहेत. श्रीसद्गुरूंशी सप्त संवत्सरांचा उणापुरा सहयोग त्यांना लाभला होता. त्यांच्या हातून श्रीसद्गुरू गुलाबराव महाराज यांची उदंडसेवा झाली आहे, होत आहे व तशीच निरंतर वृद्धिंगत होत रहावी अशी प्रार्थना करून येथे हे चार शब्द संपवितो

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

क्षत्रिय माळी

स्वाध्याय अतिक्रमण

Anita Patil ||| अनिता पाटील विचार मंच: स्वाध्याय परिवाराला अस्पृश्यता परत आणायची आहे का?